30 ते 40 भाविकांवर संकट! यशवाडीतील हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; बचावकार्यासाठी प्रशासनाची धावपळ

परभणी : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात शनिवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. मंदिर परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या सभामंडपाचा काही भाग अचानक कोसळल्याने 30 ते 40 भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून प्रशासनाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.

यशवाडीचे हनुमान मंदिर हे मराठवाड्यासह राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. शनिवार असल्याने मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. याचवेळी मंदिर परिसरात नवीन सभामंडप उभारणीचे काम सुरू होते. दुपारच्या सुमारास अचानक बांधकामाचा भाग कोसळल्याने मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच धुळीचे लोट परिसरात पसरले. घाबरलेल्या भाविकांनी बाहेर धाव घेतली, तर अनेक जण मलब्याखाली अडकल्याची माहिती समोर आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल विभाग, आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांनीही तातडीने मदतीसाठी पुढाकार घेत ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले. अडकलेल्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जेसीबी, क्रेन आणि अन्य यंत्रसामग्रीची मदत घेतली जात आहे.

दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून जखमींवर त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. बचावकार्यात कोणतीही अडचण येऊ नये, तसेच आवश्यक सर्व यंत्रणा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
सभामंडप नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र बांधकामाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर या दुर्घटनेची सखोल चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.