हमाल, वाहनचालकांच्या मुलांनी वडिलांच्या कष्टाचं चीज केलं!! प्रशासकीय सेवेत निवड करून गावाची ओळख निर्माण केली अन् गलांडवाडी बनले अधिकाऱ्यांचे गाव…


इंदापूर : इंदापूर तालुक्यातील मौजे गलांडवाडी नंबर एक येथील दोन युवती तसेच एका युवकाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
यातील दोन मुली या हमाली काम करणाऱ्या तर एक मुलगा वाहनचालकाच्या कुटुंबातील आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास तसेच मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवले आहे.

त्यांनी प्रशासकीय स्पर्धेत मोठं यश मिळवले आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेले गलांडवाडी नंबर एक हे गाव हमाल, शेतमजूर व कामगारांचे गाव म्हणून ओळखले जात होते. येथील लोक खडीवरती, नालाबंधारे, ऊसतोडणी, वाहनचालक तसेच हमाली अशा प्रकारची कष्टाची कामे करत होती.

कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविताना शिक्षणाकडे कुणाचाही फारसा कल नव्हता. परंतु उजनी धरण झाल्यानंतर १९८० सालापासून उजनीचे पाणलोट क्षेत्र झाल्यानंतर तसेच त्यानंतर कर्मयोगी कारखाना व सोनाई दूध संघ झाल्यानंतर गावात सुबत्ता निर्माण होवू लागली. त्यानंतर या गावात हळूहळू ६ कृषी सहाय्यक, विविध अधिकारी झाल्यानंतर शिक्षणाचे महत्व गावास पटायला लागले.

गावातील दोन हमाल आणि एक ड्रायव्हर यांच्या मुलांनी जिद्द, आत्मविश्वास व चिकाटीने इतिहास घडवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोहन ज्ञानदेव गलांडे यांनी हमाली करून आपल्या मुलगी कु. पूजा हिला इन्कम टॅक्स ऑफिसर बनवले आहे.

आप्पा सुखदेव शिंगटे यांनी देखील हमाली करून आपला मुलगा अक्षय याला इन्कमटॅक्स ऑफिसर बनवले आहे. तसेच एक ड्रायव्हर म्हणून सोनाई दूध संघाच्या गाडीवरती काम करणारे विठ्ठल वाघमारे यांची कन्या अंजली ही देखील इन्कमटॅक्स ऑफिसर बनली आहे. पूजा मोहन गलांडे, अक्षय आप्पा शिंगटे, अंजली विठ्ठल वाघमारे या तीनही नूतन अधिकाऱ्यांनी गलांडवाडी नंबर एकचे नाव मोठे केले आहे.

राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सोनाई दूध संघाचे संचालक प्रविण माने, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, दूध गंगा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष उत्तमराव जाधव, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विधीज्ञ मनोहर चौधरी, युवा नेते दीपक जाधव, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ फलफले, भगवान महाडिक, योगेश गलांडे यांनी या नूतन अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे सर्व ग्रामस्थ कौतुक करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!