आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ‘या’ तारखेपासून सुरू; वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा

पुणे : हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या लाखो कर्मचारी आणि पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निश्चित होण्याच्या मार्गावर आहे. ही बहुप्रतिक्षित मेट्रो सेवा जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या मेट्रो सेवेमुळे हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार असून, गणेशखिंड रस्ता तसेच हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
हिंजवडी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी ही शहरातील तिसरी मेट्रो मार्गिका आहे. हा प्रकल्प पीएमआरडीएच्या माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारीत ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ कंपनीकडून राबवला जात आहे.

ही सेवा यापूर्वी मार्च २०२५ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, कामातील विलंबामुळे उद्घाटन लांबले. त्यानंतर १५ जुलैचा मुहूर्तही पुढे ढकलण्यात आला.

पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या माहितीनुसार, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची तपासणी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पूर्ण करण्यात आली आहे. व्यावसायिक सेवा सुरू करण्यासाठी अंतिम मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, मंजुरी मिळताच मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील कामांचा विलंब आणि भूसंपादनाच्या अडचणींमुळे हा प्रकल्प एक वर्षापेक्षा अधिक काळ रखडला. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चातही वाढ झाली आहे. मात्र, वाढीव खर्चाचा भार सरकार किंवा नागरिकांवर पडणार नसून तो संबंधित कंपनीकडून उचलला जाणार आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात मेट्रो सेवा सुरू झाली तरी संपूर्ण मार्गावरील सर्व स्थानकांवर पूर्ण क्षमतेने सेवा सुरू होण्यासाठी मार्च २०२७ पर्यंत वेळ लागू शकतो. मात्र, सुरुवातीची सेवा सुरू झाल्याने पुणेकरांना आणि आयटी कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.