आनंदवार्ता! बळीराजाच्या खात्यात आज जमा होणार 23 वा हप्ता; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. देशभरातील बळीराजांच्या खात्यात एकूण 31 कोटी 44 लाख रुपयांचे थेट हस्तांतरण (DBT) करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमधील हुगळी (तारकेश्वर) येथे आयोजित किसान सन्मान समारोहातून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम हस्तांतरित करणार आहेत.

सायंकाळी 4 वाजता पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यापूर्वी लाभार्थ्यांनी आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर “Farmer Corner” विभागात जाऊन लाभार्थी यादी तपासता येते. आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून “Get Data” वर क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस पाहता येते.

ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे आणि आधार बँक खात्याशी लिंक केले आहे, त्यांच्या खात्यातच ही रक्कम जमा होणार आहे. तसेच सरकारने AgriStack पोर्टलवर नोंदणी करणेही अनिवार्य केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण नसल्यास हप्ता अडकू शकतो.

पीएम किसान योजनेसंदर्भात काही अडचण असल्यास 1800-115-5525 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येतो. बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी ई-केवायसी आणि भू-सत्यापन प्रक्रिया बंधनकारक करण्यात येते. ही प्रक्रिया अपूर्ण असल्यास हप्ता जमा होत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.