माथेरानला जाणाऱ्यांसाठी खुशखबर! पावसाळ्यानंतर मिनी ट्रेन सुरू होणार, कुठून किती वाजता सुटणार?

पुणे : माथेरानला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. माथेरानची प्रसिद्ध नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा शुक्रवार, 30 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होत आहे.

पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेली ही सेवा आता पूर्ववत होणार असल्याने पर्यटकांना निसर्गरम्य प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. मध्य रेल्वेने यासाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले असून, नेरळ-माथेरान मार्गावर दररोज नियमित गाड्या धावणार आहेत.
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे वेळापत्रक


नेरळहून माथेरानला जाणाऱ्या प्रवाशांसाठी दररोज दोन गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 52103: नेरळहून सकाळी 8.50 वाजता सुटणार, माथेरानला सकाळी 11.30 वाजता पोहोचणार.
गाडी क्रमांक 52105: नेरळहून सकाळी 10.25 वाजता सुटणार, माथेरानला दुपारी 1.05 वाजता पोहोचणार.
माथेरानहून नेरळला परतण्यासाठी गाड्या कधी?
माथेरानहून नेरळला परतणाऱ्या पर्यटकांसाठीही दोन गाड्या उपलब्ध असतील.
गाडी क्रमांक 52104: माथेरानहून दुपारी 2.45 वाजता सुटणार, नेरळला सायंकाळी 5.30 वाजता पोहोचणार.
गाडी क्रमांक 52106: माथेरानहून सायंकाळी 4 वाजता सुटणार, नेरळला सायंकाळी 6.40 वाजता पोहोचणार.
मिनी ट्रेनमध्ये कोणते डबे असणार?
प्रवाशांना आरामदायी प्रवासासोबत निसर्गाचा आनंद घेता यावा, यासाठी मिनी ट्रेनमध्ये विविध प्रकारच्या डब्यांचा समावेश करण्यात आला आहे. एका गाडीला तीन द्वितीय श्रेणीचे डबे, एक विस्टाडोम डबा आणि दोन द्वितीय श्रेणीचे सामानासह डबे असतील. दुसऱ्या गाडीमध्ये तीन द्वितीय श्रेणीचे डबे, एक प्रथम श्रेणीचा डबा आणि दोन द्वितीय श्रेणीचे सामानासह डबे असणार आहेत.
विस्टाडोम डब्यातून प्रवाशांना प्रवासादरम्यान आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेता येणार आहे.
अमन लॉज-माथेरान शटल सेवाही सुरू
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनसोबतच अमन लॉज ते माथेरानदरम्यानची शटल सेवाही नियमित सुरू राहणार आहे. या मार्गावर दररोज दोन्ही दिशांनी मिळून सहा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
अमन लॉजहून सुटण्याच्या वेळा:
सकाळी 8.45
सकाळी 9.35
दुपारी 12.00
दुपारी 2.25
दुपारी 3.40
सायंकाळी 5.45
माथेरानहून अमन लॉजसाठी सुटण्याच्या वेळा:
सकाळी 8.20
सकाळी 9.10
सकाळी 11.35
दुपारी 2.00
दुपारी 3.15
सायंकाळी 5.20
शनिवार-रविवारी अतिरिक्त शटल फेऱ्या
वीकेंडला माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेऊन शनिवारी आणि रविवारी दोन्ही दिशांना आणखी दोन अतिरिक्त विशेष शटल फेऱ्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
पावसाळ्यानंतर हिरवाईने नटलेले डोंगर, दाट जंगल आणि माथेरानची लाल माती अनुभवण्याची संधी पर्यटकांना पुन्हा मिळणार आहे. त्यामुळे आगामी वीकेंडला माथेरानला जाण्याचा बेत आखणाऱ्यांसाठी मिनी ट्रेन सेवा सुरू होणे ही आनंदाची बातमी ठरणार आहे. प्रवासाला जाण्यापूर्वी तिकीट उपलब्धता आणि अद्ययावत वेळापत्रकाची अधिकृत रेल्वे स्रोतांवर खात्री करून घ्यावी.
