लवकरच स्वस्त होणार सोनं!! गुंतवणूकदारांची झोप उडवणारी बातमी आली समोर, नेमकं काय घडलं?

मुंबई : सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडले असून खरेदी करणे आवाक्याबाहेर गेलं आहे. अशातच एक आनंदाची बातमी आली आहे. सध्या भारतात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे ९०,००० रुपये इतकी आहे. मात्र, मॉर्निंगस्टारचे रणनीतीकार जॉन मिल्स यांच्या मते, जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊन त्याची किंमत १८२० डॉलर प्रति औंसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
त्याचा थेट परिणाम भारतातील दरांवर होईल आणि १० ग्रॅम सोनं सुमारे ५५,००० रुपयांपर्यंत मिळू शकतं. आगामी काळात सोन्याच्या दरात तब्बल ३८ टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्याच्या महागाईच्या काळात गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी ठरू शकते. सोन्याच्या किमतीत होणाऱ्या घसरणीमागे अनेक जागतिक आणि आर्थिक घटक कारणीभूत ठरत आहेत.
केंद्रीय बँकांकडून मागणी कमी होणार असल्याचंही चित्र आहे. २०२३ मध्ये सुमारे १,०४५ टन सोने खरेदी करणाऱ्या ७१ बँकांनी आता त्यांचा साठा कायम ठेवण्याचा किंवा घटवण्याचा विचार केला आहे, असे वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
सोन्याच्या किमती वाढण्यामागे गेल्या काही महिन्यांत महागाई, आर्थिक अनिश्चितता, युद्धजन्य वातावरण यासारख्या घटकांचा प्रभाव होता. गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याची मागणी वाढली होती. आता या मागणीत घट होण्याची शक्यता आहे. २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याच्या खाणकामातून होणारा नफा $950 प्रति औंसपर्यंत पोहोचला होता.
ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे. जागतिक सोन्याचा साठा ९ टक्क्यांनी वाढून २,१६,२६५ टन झाला आहे. तसेच रिसायकल सोन्याचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे किमती घसरण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे पुढील काही महिन्यांत सोन्याच्या दरात घसरण होऊन सामान्य खरेदीदारांना अधिक परवडणाऱ्या दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळू शकते.