अबब! सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले सोन्याचे दर, भाव पोहोचले लाखाच्या घरात..

नवी दिल्ली : सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे, सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता सोन्याच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांकी झेप घेतली आहे. सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून सोन्याच्या दरात रात्रीतून पुन्हा 1500 रुपयांची मोठी वाढ झाली आहे.
सोन्याचे दर 99000 रुपये झाले आहेत. तर जीएसटीसह हेच सोन्याचे दर 102000 रुपये इतके झाले आहेत. अशा स्थितीत आज, 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमतीत पाहून सामान्यांना धडकी भरेल एवढी वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारात 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर MCX वरील सोन्याचा जून वायदा दरांनी मंगळवारी प्रति 10 ग्रॅम 99,178 रुपयांचा नवीन उच्चांक गाठला, जो मागील बंदपेक्षा जवळपास 1,900 रुपयांनी वाढला आहे.
सोमवारी जीएसटी वगळता सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 97,200 रुपये होता तर 3 टक्के जीएसटी जोडून किरकोळ बाजारात सोन्याच्या किमती 1 लाख रुपयांच्या पातळीपेक्षा जास्त वाढल्या.
दरम्यान, चांदीचा मे वायदा भाव 0.33% किंवा 315 रुपयांनी वाढून 95,562 रुपये/किलोवर ओपन झाला. मागील व्यापार सत्रात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी सकारात्मक पातळीवर स्थिरावले होते.