दिवाळीच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण, जाणून घ्या काय आहे दर..

पुणे : सण म्हटला की सोनं आणि चांदीची खरेदी ही जोरातच असते. सण जर दिवाळीचा असेल तर दागिन्यांची खरेदी ही जोरदार दिसते. आता आज दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज आहे. या भाऊबीजेचा मुर्हुत साधत Gold Rate पुन्हा आपली चाल बदलेली दिसली.

भाऊबीजेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात अनपेक्षित बदल पाहायला मिळाला. वायदे बाजारात सोन्याच्या दरात तब्बल सहा हजार रुपयांची घसरण झाली आहे. एका दिवसात एवढी मोठी घट पाहायला मिळणे दुर्मिळ आहे. आज सोन्याच्या वायद्याची किंमत १,२२,८०६ रुपये नोंदवली गेली. सुरुवातीला दर कमी झाले असले तरी दिवसाच्या अखेरीस ९०० रुपयांची किरकोळ वाढ दिसली.

दरम्यान, दागिन्यांच्या बाजारातही सोन्याच्या किमतींमध्ये थोडीशी घट झाली आहे. सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा दर १,१५,३९० रुपये असून २४ कॅरेट सोन्याची किंमत १,२५,८८० रुपये आहे. दर केवळ १०० रुपयांनी कमी झाले असले तरी, सोनं अजूनही ‘महागड्या लक्झरी’च्या यादीतच आहे. या छोट्या घटीनंही ग्राहकांना फारसा दिलासा मिळालेला नाही.

चांदीच्या बाजारातही निराशाजनक स्थिती पाहायला मिळत आहे. आज एका किलो चांदीचा दर १,५९,९०० रुपयांवर आला आहे. काही दिवसांपूर्वी चांदीचे भाव दोन लाखांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु आता अचानकच त्या आशा फोल ठरल्या आहेत.
तज्ज्ञांच्या मते, चांदीच्या मागणीत घट आणि पुरवठ्यात वाढ झाल्याने दर घसरले आहेत. त्यामुळे सध्या चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी हा योग्य काळ मानला जातो. दिवाळीत सोन्याचा योग जुळला नाही, तरी चांदीचा योग मात्र उजळला आहे असं म्हणावं लागेल.
दिवाळीनंतर आता लग्नाचा सिझन सुरु होणार आहे आणि या काळात दागिन्यांची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील काही आठवड्यांत सोन्याच्या किंमती पुन्हा वर चढू शकतात. सणानंतर थोडीशी विश्रांती घेतलेला बाजार आता पुन्हा तेजीत जाण्याची चिन्हं आहेत.
