NEET घोटाळ्यात ‘गॉड’चा गेम ओव्हर! पुणे ते लातूर पेपरफुटी रॅकेटचा धक्कादायक उलगडा

पुणे : देशाला हादरवून टाकणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत पुण्यातील ‘गॉड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. या कारवाईनंतर एकूण अटक झालेल्या आरोपींची संख्या 13 वर पोहोचली असून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.

सीबीआय तपासात मनिषा हवालदार यांच्या मोबाईलमध्ये ‘गॉड’ या नावाने सेव्ह असलेला नंबर हे महत्त्वाचे धागेदोरे ठरले. या आधारे पुण्यातील डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीतील फिजिक्स शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह यालाच ‘गॉड’ म्हणून ओळखले जात असल्याचे समोर आले आहे. त्याने मनिषा हवालदारकडून फिजिक्सचे प्रश्न मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तसेच लातूरमधील सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचे डॉक्टर मनोज शिरुरे यालाही सीबीआयने ताब्यात घेतले आहे. शिरुरे हा या संपूर्ण रॅकेटमधील महत्त्वाचा दुवा असल्याचे मानले जात असून त्याने केमिस्ट्रीचे लीक झालेले प्रश्न मिळवून काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात मध्यस्थी केल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून डिजिटल पुरावे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने एनटीए पॅनलमध्ये पी. व्ही. कुलकर्णी आणि मनिषा मांढरे यांची नियुक्ती करून प्रश्नपत्रिका बाहेर काढल्याचा आरोप आहे.

कुलकर्णी आणि मांढरे यांनी एनटीए ऑफिसमध्ये बसून प्रश्न लक्षात ठेवले आणि बाहेर येऊन त्याचे लिखाण करून पीडीएफ तयार करत मोटेगावकरला पाठवले, असा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हे प्रश्न नंतर मोठ्या रकमेत विकले गेल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणात तीन विद्यार्थ्यांना परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिकेची माहिती मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील एक विद्यार्थी लातूरमधील कोचिंग सेंटर संचालकाचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. त्याच्या माहितीमुळेच संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
पुण्याचा शिक्षक, लातूरचा डॉक्टर आणि एनटीए पॅनलमधील अधिकारी अशा हाय-प्रोफाईल नेटवर्कमुळे देशभरात खळबळ उडाली असून शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.