गुंड गजा मारणेचे व्हिडिओ व्हायरल करणे भोवले! पुण्यात चार महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात…

पुणे : इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी कुख्यात गुंड गजा मारणे याचे व्हिडिओ व्हायरल करून दहशत निर्माण करणाऱ्या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक करून खंडणीविरोधी पथक दोनने कारवाई केली आहे.
अक्षय निवृत्ती शिंदे (वय.१९, रा.निमगाव खालू, श्रीगोंदा), सिद्धार्थ विवेकानंद जाधव (वय. २०, रा. मोहमंदवाडी), साहिल शाहिल शेख (वय.१९, रा. सुंबा, धाराशिव), इरफान हसन शेख (वय १९, रा. सुंबा, धाराशिव) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत शिंदे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते. त्यापार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथकाने रिल्सस्टारना बोलावून घेत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दरम्यान, कुख्यात सराईत गजा मारणे याचेही व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल केले जात होते.
फॉलोअर वाढविण्यासाठी मारणेच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून व्हिडिओतून दहशत निर्माण केली. किंग ऑफ पुणे, पुण्याचा बादशहा अशा कॅप्शनसह वाहनांचा ताफा, जमलेली गर्दी असा मारणेचा व्हिडिओ व्हायरल केला होता. धमकीवजा इशार्याचे अनेक व्हिडिओ गुन्हे शाखेच्या नजरेत आले.
अमितेश कुमार यांनी दिला इशारा..
संबंधित विद्यार्थ्यांनी गजा मारणेच्या नावाने सोशल मीडियावर पुण्याचा किंग, किंग ऑफ महाराष्ट्र, बादशहा अशाप्रकारचे कॅप्शन लिहून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल केले होते. त्यांच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियाद्वारे व्हिडिओतून दहशत निर्माण करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.