GDPचा आकडा ७.८%, पण पवारांचा ‘हिशोब’ वेगळाच! महागाईवरून केंद्राला सुनावलं; म्हणाले, ‘खिशातून पैसा जास्त जाणार’

मुंबई : देशाचा आर्थिक विकासदर ७.८ टक्क्यांवर पोहोचल्याने केंद्र सरकारकडून या कामगिरीचे कौतुक केले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या उत्साहावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे चित्र दाखवले जात असले, तरी सामान्य नागरिकांच्या आयुष्यातील वास्तव वेगळे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारताचा GDP ७.८ टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी सरकारने जाहीर केली. मात्र, या वाढीचा थेट फायदा सर्वसामान्यांना किती मिळतोय, असा सवाल पवारांनी उपस्थित केला. पंतप्रधान आणि अर्थमंत्री अर्थव्यवस्था अतिशय चांगली असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली. अर्थव्यवस्थेसमोरील मूळ समस्या दुर्लक्षित होत असल्याचेही पवार म्हणाले.

महागाईचा मुद्दा उपस्थित करत पवारांनी नागरिकांच्या खिशावर वाढत्या खर्चाचा भार पडत असल्याचे सांगितले. सरकार आर्थिक विकासाच्या आकड्यांचा गवगवा करत असले, तरी प्रत्यक्ष बाजारातील परिस्थिती आणि सर्वसामान्यांच्या खर्चाचा विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘खिशातून पैसा जास्त जाणार आणि महागाईच्या झळा बसणार’, अशी भूमिका त्यांनी मांडली.


दरम्यान, GDPच्या ७.८ टक्के वाढीच्या आकडेवारीवरून विरोधक आणि काही अर्थतज्ज्ञांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. GDP मोजण्याच्या नव्या पद्धतीमुळे विकासदर फुगलेला दिसत असल्याचा दावा टीकाकारांकडून केला जात आहे. काँग्रेसनेही सरकारवर आकडेवारीच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. GDPला बिअरच्या फेसाशी तुलना करत काँग्रेसने सरकारच्या आकडेवारीवर टीका केली.
मात्र, केंद्र सरकारने विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत. सांख्यिकी विभागाच्या म्हणण्यानुसार GDPची नवीन मालिका अधिक अद्ययावत माहिती, नवीन स्रोत आणि सुधारित गणना पद्धतीवर आधारित आहे. त्यामुळे ७.८ टक्के विकासदर हा योग्य असल्याचा सरकारचा दावा आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही विरोधकांवर पलटवार करत देशाची प्रगती काहींना सहन होत नसल्याची टीका केली.
त्यामुळे आता GDPचा ७.८ टक्क्यांचा आकडा विरुद्ध जनतेच्या खिशावरचा महागाईचा भार असा नवा राजकीय वाद रंगला आहे. सरकार आर्थिक प्रगतीचा दाखला देत असताना शरद पवारांनी मात्र आकडेवारीपेक्षा सामान्यांच्या वास्तवाकडे पाहण्याचा मुद्दा पुढे आणला आहे.