नागपुरात DJचा दणदणाट थांबला! नांगरे पाटलांचा कडक आदेश; १ नोव्हेंबरपर्यंत DJसह लेझर लाईटवरही बंदी

नागपूर : गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात होत असतानाच नागपुरात डीजेच्या दणदणाटावर पोलिसांनी लगाम घातला आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज रात्रीपासून १ नोव्हेंबरपर्यंत डीजेच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील मिरवणुका आणि आगामी सणांमध्ये डीजेचा वापर करता येणार नाही.
या आदेशाची व्याप्ती केवळ डीजेपुरती मर्यादित नसून डीजेची वाहने, डिम लाईट आणि लेझर लाईटवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. सण-उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजातील संगीत आणि प्रखर प्रकाशयोजनांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण तसेच नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने ही भूमिका घेतल्याचे समोर आले आहे.

सध्या राज्यभर गणेशोत्सवाची तयारी सुरू असून नागपुरातही विविध गणेश मंडळांकडून मिरवणुका, सजावट आणि धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. अशा वेळी डीजे आणि लेझर लाईटवर दीर्घ कालावधीसाठी बंदी घालण्यात आल्याने गणेश मंडळांच्या कार्यक्रमांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. आयोजकांना पोलिसांच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.


दरम्यान, डीजे आणि लेझर लाईटच्या वापरावरून महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही चर्चा सुरू आहे. पुण्यात नागरिकांकडून ध्वनिप्रदूषण आणि लेझर लाईटवर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत असतानाच नागपुरात पोलीस प्रशासनाने थेट कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे.
नागपुरातील बंदी नेमकी काय?
• कालावधी : आज रात्रीपासून १ नोव्हेंबरपर्यंत
• डीजेच्या वापरावर बंदी
• डीजेच्या वाहनांवर निर्बंध
• डिम लाईट वापरण्यास बंदी
• लेझर लाईटवरही बंदी
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवताना सार्वजनिक शांतता, ध्वनिप्रदूषण आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आता गणेश मंडळे आणि आयोजक या आदेशाला कसा प्रतिसाद देतात, याकडे लक्ष लागले आहे.