चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ? शाळेच्या पोषण आहारातील सोयाबीन वडी फोडताच पालकांचे डोळे पांढरे; धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार उघड

धाराशिव : वाशी तालुक्यातील पारा येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी 301 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारातील भात आणि सोयाबीन वड्यांमध्ये अळ्या आढळल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने रात्री शाळेत धाव घेऊन अन्नाचे नमुने जप्त केले.

शनिवार असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत मिळालेला पोषण आहार डब्यात भरून घरी आणला होता. दुपारी जेवताना एका पालकाला भातात अळ्या दिसल्या. त्यानंतर सोयाबीन वडी फोडून पाहिल्यानंतर तिच्या आतही शिजलेल्या मृत अळ्या आढळल्याचा दावा पालकांनी केला. या प्रकारामुळे संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत प्रशासनाला जाब विचारला.
या घटनेमुळे तालुक्यातील 68 जिल्हा परिषद आणि 24 अनुदानित अशा एकूण 92 शाळांमध्ये पुरवण्यात आलेल्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जून-जुलै महिन्यासाठी तांदूळ, मटकी, चवळी, हरभरा, सोयाबीन वडी आणि मूगडाळ यांचा साठा या शाळांना पुरवण्यात आला होता.

शालेय पोषण आहाराचे वितरण मुंबईस्थित ‘केंद्रीय भंडार’ या संस्थेमार्फत केले जाते. मात्र, निकृष्ट धान्याचा पुरवठा नेमका कुठे झाला, उपकंत्राटदारांकडून निष्काळजीपणा झाला का, याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.

एका पालकाने सांगितले की, “माझ्या मुलाला वारंवार पोटदुखीचा त्रास होत होता. शनिवारी डबा घरी आणल्यानंतर सोयाबीन वडी फोडून पाहिली, तेव्हा तिच्या आत अळ्या आढळल्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
दरम्यान, गटशिक्षणाधिकारी सोमनाथ घोलप यांनी सर्व शाळांना पोषण आहाराची मुदत, गुणवत्ता आणि धान्याची तपासणी करूनच स्वयंपाक करण्याचे कडक आदेश देण्यात येणार असल्याचे सांगितले.