१ जुलैपासून रस्त्यावर उतरल्यावर खिशाला बसणार फटका! नंबर प्लेटची ही अट पूर्ण नाही केली तर थेट दंड

“नंबर प्लेट तपासा… नाहीतर दंडासाठी तयार राहा!” महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी परिवहन विभागाने आता कडक भूमिका घेतली आहे. जुन्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य करण्यात आले असून, १ जुलै २०२६ पासून नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई होणार आहे. त्यामुळे लाखो वाहनधारकांना आता वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट सक्तीची केली आहे. सुरुवातीला यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक वाहनधारकांनी अद्याप नंबर प्लेट बदललेली नसल्याने शासनाने अंतिम मुदत वाढवून ३० जून २०२६ केली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ही शेवटची मुदत आहे. ३० जूननंतर नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.”

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, १ जुलैपासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू होणार आहे. HSRP प्लेट नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे वाहनधारकांनी दंड टाळण्यासाठी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

HSRP प्लेटमध्ये विशेष सुरक्षा तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामध्ये लेझर कोड, होलोग्राम आणि डिजिटल ओळख प्रणाली असते. यामुळे बनावट नंबर प्लेट, वाहन चोरी आणि गुन्हेगारीसाठी वाहनांचा वापर रोखण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
दरम्यान, वाहनधारकांनी कोणत्याही एजंटच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊन अधिकृत केंद्रावर HSRP प्लेट बसवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
आता ३० जूनपर्यंतची मुदतच वाहनधारकांसाठी शेवटची संधी मानली जात असून, वेळेत नंबर प्लेट न बदलल्यास १ जुलैनंतर थेट दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते.