माजी सैनिकास मिळाला मानाचा वारकरीचा मान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न…

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांच्या मेळ्याने पंढरपूर सजले. वारकऱ्यांच्या भक्तीला उधाण आले. आषाढ धारा कोसळत असताना भक्तीरसात वारकरी चिंब झाले. विठ्ठल दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून वारकऱ्यांची पावले पंढरपूरकडे वळली होती. सुमारे २० लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. विठू नामाच्या जयघोषात पंढरपूर नगरी दुमदुमली.
यावेळी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील माजी सैनिक कैलास दामू उगले आणि त्यांच्या पत्नी कल्पना उगले या वारकरी दांपत्याला मानाचा वारकरी म्हणून गौरविण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या दांपत्याचा शाल आणि विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
गेल्या १५ वर्षांपासून उगले दाम्पत्य पायी वारी करत असून, त्यांनी वारकरी संप्रदायातील निष्ठा आणि सेवा यामुळे हा सन्मान मिळवला. यंदा सुमारे २० लाख भाविकांनी पंढरपूरमध्ये उपस्थित राहून विठ्ठल नामस्मरणात स्वतःला रंगवले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजावट करण्यात आली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता व कन्या दिविजा यांच्यासह विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि जनतेच्या सुख-समृद्धीसाठी व महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.