आधी पाहायचा तो व्हिडिओ, मग सुरू व्हायचा छळ; खराडीतील भोंदूबाबाबद्दल नवे धक्कादायक खुलासे..

पुणे : स्वतःला ईश्वराचा अवतार म्हणवून घेणाऱ्या राधामोहन मिश्रा या भोंदूबाबाच्या छळछावणीतून सुटका झालेल्या उच्चशिक्षित तरुणीने पोलिसांसमोर दिलेल्या पुरवणी जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. खराडी परिसरातील या आश्रमातील प्रकार ऐकून समाजात संताप व्यक्त केला जात आहे.

पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, आश्रमातील काही महिला अनुयायीच या भोंदू बाबाला मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ दाखवायच्या. त्यानंतर तो व्हिडिओ पाहून राधामोहन मिश्रा हा उपस्थित महिला अनुयायांसमोरच पीडितेवर लैंगिक अत्याचार करायचा. विरोध केल्यास पीडितेचे हात-पाय बांधले जायचे, तिला गुंगी आणणारी इंजेक्शने दिली जायची आणि अमानुषतेची सर्व कृत्य करत जबरदस्तीने मूत्र पाजले जायचे.
सन २०२३ मध्ये जेव्हा पीडिता उबाळेनगर येथील या आलिशान बंगल्यातील आश्रमात वास्तव्यास होती, तेव्हा तिथल्या महिला अनुयायीच पीडितेला काय शिक्षा द्यायची हे ठरवायच्या. आश्रमातील काम वेळेत पूर्ण न झाल्यास पीडितेला ‘टेसर गन’ने (इलेक्ट्रिक शॉक देणारी बंदूक) शॉक दिले जायचे, तापलेल्या मेणबत्तीने चटके दिले जायचे आणि बेदम मारहाण केली जायची.

अनेकदा या महिलाच पीडितेला जबरदस्तीने विवस्त्र करून मिश्राच्या बेडरूममध्ये ढकलून द्यायच्या. पीडितेने रडून विरोध केला तर, आम्हीही हे सगळं सहन केलं आहे, हाच कल्याणाचा मार्ग आहे, असे सांगून तिच्यावर दबाव आणून तिला गप्प केले जात होते.

खराडी पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा, त्याचा साथीदार स्वामी कवलनयन आणि त्याला या अघोरी कृत्यात मदत करणाऱ्या ६ महिला अनुयायांसह एकूण ८ जणांवर विविध कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, पोलीस त्यांच्याकडून अधिक माहिती काढत आहेत.