अखेर पुण्यात पावसाची हजेरी? पुढील 2-3 दिवसांसाठी हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. शहरातील कमाल तापमानातही वाढ झाली असून, उन्हाचा चटका जाणवत आहे. जुलै महिन्यात दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला मात्र काहीशी विश्रांती घेतली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी आता दिलासादायक बातमी समोर आली आहे.

पुण्यात पुढील 2-3 दिवसांत पावसाची शक्यता

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत पुणे शहर आणि परिसरात तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा असलेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पारा 31 अंशांवर; उकाडा कायम

शुक्रवारी दिवसभर शहरात आकाश मुख्यतः निरभ्र राहिल्याने तापमानात किंचित वाढ झाली. पुण्यात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पुढील दोन दिवस कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याने उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.

शनिवारी पुण्यात कसं असेल हवामान?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारी सकाळच्या सुमारास आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मात्र, दुपारनंतर आकाश ढगाळ होऊ शकते. दुपार किंवा सायंकाळच्या सुमारास हलका ते अतिहलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाची शक्यता असली तरी तापमानात मोठा बदल अपेक्षित नसल्याने पुणेकरांना उकाड्यापासून तात्काळ पूर्ण दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.

राज्यातील काही भागांत पावसाचा जोर

दरम्यान, 19 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याशिवाय 11 जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!