तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर FDAची धडक कारवाई! प्रसिद्ध ‘के. रुस्तम आईस्क्रिम’चा परवाना रद्द; तपासणीत आढळली अस्वच्छता, उंदीर-माशांचा वावर

मुंबई : मुंबईच्या चर्चगेट परिसरातील प्रसिद्ध आणि जुन्या ‘के. रुस्तम आईस्क्रिम पार्लर’वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळून आल्याने प्रशासनाने या पार्लरचा व्यवसाय परवाना रद्द केला असून अंतिम तपासणी अहवाल येईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

FDAच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीत पार्लरमधील स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबत अनेक त्रुटी आढळल्या. स्वयंपाकघर आणि साठवणूक परिसरात अस्वच्छता दिसून आली असून जिवंत उंदीर आणि माश्या आढळल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय आईस्क्रिम तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे काही पदार्थ मुदत संपलेले आढळले. यामध्ये पिस्ता, स्वीट ऑरेंज, चेरी, बदाम, अमेरिकन आईस्क्रिम सोडा आणि मिक्स फ्रूट यांसारख्या घटकांचा समावेश होता. ग्राहकांच्या आरोग्याचा धोका लक्षात घेऊन हे साहित्य FDA अधिकाऱ्यांनी जागीच नष्ट केले.

यापूर्वी प्रयोगशाळेच्या तपासणीत पार्लरच्या उत्पादनांमध्ये मिल्क फॅटचे प्रमाण निर्धारित मानकांपेक्षा कमी आढळले होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांनुसार आईस्क्रिममध्ये आवश्यक मिल्क फॅटचे प्रमाण पूर्ण असणे गरजेचे असते. त्यामुळे या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

FDAने आईस्क्रिमचे नवीन नमुने तपासणीसाठी पाठवले असून अंतिम अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
दरम्यान, FDAची ही मोहीम केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून राज्यभर सुरू आहे. नागपूरमध्ये ‘श्री हिरा स्वीट्स’ येथे गंभीर अस्वच्छता आढळल्यानंतर परवाना निलंबित करण्यात आला, तर धुळ्यातील ‘हॉटेल पाटीलवाडा’ अधिकृत परवान्याशिवाय सुरू असल्याचे आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले असून खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.