पुणे- सोलापूर रोडवर भीषण अपघात! कुंजीरवाडी येथील नायगाव चौकात टॅंकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात उरुळी कांचन येथील महिला जागीच ठार, मुलगी जखमी…

उरुळी कांचन : पुणे- सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील आळंदी म्हातोबाची गावाकडे जाणाऱ्या चौकात टँकरने दिलेल्या धडकेत एका ३५ वर्षीय महिलेचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
तर तिच्या मुलीच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती आहे. ही घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
योगिता राजकुमार गव्हाणे, (वय. ३५, रा. होले कॉम्प्लेक्स, उरुळी कांचन, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सुरेखा राजकुमार गव्हाणे (वय. १६) असे अपघातात जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, योगिता व सुरेखा हा मायलेकी आहेत. बुधवारी सकाळी लवकर रोजच्या प्रमाणे योगिता या दुचाकीवरून शेवाळेवाडी या ठिकाणी कामाला निघाल्या होत्या. तर त्यांची मुलगी ही त्यांच्याबरोब निघाली होती.
दरम्यान, पुण्याकडे जात असताना आठ वाजण्याच्या सुमारास नायगाव चौकात पाठीमागून येणाऱ्या एका पेट्रोल डिझेलच्या टँकरने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली.
यावेळी दुचाकी चालक योगिता गव्हाणे या पुणे सोलापुर महामार्गावर कोसळल्या यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला .
या अपघाताची माहिती मिळताच महिला व मुलीला रुग्णालयात दाखल केले होते. सदरच्या अपघाताने पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती आहे.