शेतकऱ्यांनो काळजी घ्या रे!! पाऊस करणार राडा, राज्याच्या ‘या’ भागांमध्ये गारपिटीची शक्यता….

पुणे : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील हवामानाने वेगळाच रंग दाखवत आहे. दरम्यान एकीकडे उन्हाच्या झळा असताना दुसरीकडे राज्यात वादळी वाऱ्यांसह वळवाचा पाऊस अनेक भागांत कोसळला.
तसेच हवामान विभागाने याच पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांसाठी महत्वाचा इशारा दिला आहे. पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, बारा जिल्ह्यांना ऑरेंज तर संपूर्ण राज्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे.
काल महाराष्ट्रातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. ढगाळ वातावरण, वेगवान वारे आणि वीजांसह पावसामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. हवामान विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, अजून दोन दिवस महाराष्ट्रात पाऊस सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान विभागाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांसह इतर भागांनाही जोरदार पावसाचा फटका बसू शकतो. तसेच काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यामुळे या १२ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, गुरुवारीही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी मात्र पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अचानक पडणारा अवकाळी पाऊस आणि वादळी वारे हे रब्बी पिकांसाठी मोठा धोका निर्माण करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी काढणीसाठी पिकं तयार ठेवली असून, अशा वेळी पावसाचा फटका बसल्यास त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. विशेषतः गहू, हरभरा आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.