देवगिरी किल्ला परिसराला भीषण आग, आगीत अनेक प्राणी पक्षी नष्ट झाल्याची भीती….

छत्रपती संभाजीनगर : येथील दौलताबाद हा ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या परिसरात खांदुर्णी परिसरात आज आठच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. यामध्ये अनेक प्राणी पक्षी मृत्युमुखी पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आगीची व्याप्ती वाढून अग्नितांडवाने हळूहळू संपूर्ण किल्ल्याला वेढा दिला आहे.
किल्ल्यावर असलेले लहान-मोठे प्राणी जळून नष्ट झाले असून, मोर, लांडोर, माकडं आदी प्राणी सैरावैरा पळू लागली आणि त्यांनी किल्ल्याच्या परिसरातील शेतात आश्रय घेतला. ही आग नेमकं कशामुळे लागली याबाबत अधिकृतपणे माहिती समोर आली नाही.
किल्ला प्रशासनाने अग्निशमन विभागाला कळवल्यानंतर अग्निशमन विभागाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, अग्निशमन दलाच्या वाहनाला किल्ल्यात प्रवेश करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. यामुळे आग मोठ्या प्रमाणावर वाढली. यामुळे आग विझवताना अनेक अडचणी आल्या.
दरम्यान, देवगिरी किल्ल्याला दरवर्षी आग लागल्याची घटना घडत असते. त्याप्रमाणे आज आग लागली. बघता बघता ही आग संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात पसरली. या भव्य वास्तूला मोठी हानी पोहोचत असून या आगीमुळे किल्ल्यावरील पुरातन इमारती खराब होत असून कालांतराने त्या नष्ट होण्याची शक्यता आहे.