कुटुंब महाबळेश्वरला फिरायला गेलं, अज्ञाताने युवतीचे फोटो काढले, पोलिसांनी मोबाईल बघितला आणि धक्काच बसला, मोबाइलमध्ये…

महाबळेश्वर : पुण्यातील एक मुलगी कुटुंबीयांसह महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आली होती. तेव्हा बाजारपेठेत खरेदीसाठी ते फिरत होते. यावेळी पर्यटक मुलीचे फोटो एका व्यक्तीने कोणाला न समजता काढले. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त केला असून, त्यामध्ये मुलींचे अडीच हजार फोटो सापडले आहेत.
यामुळे त्यांना धक्काच बसला. संशयिताला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तौफिक इस्तियाक अहमद (वय ४० वर्ष, रा. मालेगाव, जि. नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. ती मुलगी सायंकाळी बाजारपेठेत खरेदी करत असताना मालेगाव येथून पर्यटनास आलेल्या संशयिताने मोबाइलमध्ये तिचे फोटो काढले.
एक व्यक्ती आपले फोटो काढत असल्याचे मुलीच्या निदर्शनास येताच घाबरलेल्या मुलीने याची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबाने महाबळेश्वर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संशयितासह त्याच्या मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. घडलेल्या प्रकाराची माहिती समजताच संजय पिसाळ, सचिन वागदरे यांनी पोलिसांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली.
त्यानंतर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडून झाल्याने अहमद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संबंधित कुटुंबाला तुम्ही तक्रार दिल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले. मात्र, त्यावर कुटुंबीयांनी आम्हाला तक्रार द्यायची नाही, पण मोबाइलमध्ये काढलेले फोटो डिलिट करावेत, असे सांगितले.
यानंतर हे कुटुंब हॉटेलवर निघून गेले. पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त केला आहे. हा प्रकार वेगळाच असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी संशयिताच्या चार मित्रांनाही ताब्यात घेतले आहे. ते सगळे मालेगावचे रहिवासी आहेत. यामुळे पोलीस सध्या त्याची सखोल चौकशी करत आहेत.