लेकाच्या कृत्याची शिक्षा घरच्यांना! चेतनच्या कुटुंबावर घर-दुकान सोडण्याची वेळ; नातेवाईकांकडे घ्यावा लागला आश्रय

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर आता त्याचे पडसाद शहरभर उमटताना दिसत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी चेतन चौधरीच्या कृत्यामुळे त्याच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून, त्यांना पुण्यातील स्वतःचे घर आणि दुकान सोडून नातेवाईकांकडे आश्रय घ्यावा लागल्याची माहिती समोर आली आहे.

मार्केट यार्ड परिसरात चेतनचे वडील बाबूलाल सीरवी यांचा ड्रायफ्रूट्स आणि किराणा मालाचा व्यवसाय आहे. मात्र, २५ जूनपासून त्यांचे दुकान बंद असून, परिसरातील तणाव आणि सुरक्षेच्या कारणास्तव कुटुंबाने राहते घरही रिकामे केले आहे. सध्या ते नातेवाईकांकडे राहत असल्याचे सांगितले जात आहे.
मार्केट यार्ड परिसरात राजस्थानातील मारवाड-मेवाड भागातील अनेक व्यापारी वास्तव्यास असून, ते प्रामुख्याने ड्रायफ्रूट्स आणि किराणा व्यवसायाशी संबंधित आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक व्यापाऱ्यांनी काही काळ दुकानेही बंद ठेवली होती.

दरम्यान, केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर २७ जून रोजी पुण्यात कँडल मार्च काढण्यात आला होता. त्यानंतर मार्केट यार्ड परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ला परिसरात केतन अग्रवालचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे भासविण्यात आल्याचा संशय होता. मात्र, तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांकडून विविध पैलूंची चौकशी केली जात आहे.