“सत्य बाहेर येण्याची वेळ आली!” लोहगडावरील प्रत्यक्षदर्शी पुढे सरसावले; केतन प्रकरणात विशाल अग्रवालांचा मोठा दावा


पुणे : केतन अग्रवाल हत्याप्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असताना आता या प्रकरणाच्या तपासासाठी महत्त्वाचे ठरू शकणारे काही प्रत्यक्षदर्शी पुढे येण्यास सुरुवात झाल्याचा दावा केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी केला आहे. लोढा सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या कॅण्डल मार्चनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

केतनला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोसायटीतील रहिवाशांनी गणपती मंदिरापासून त्याच्या घरापर्यंत कॅण्डल मार्च काढला होता. या वेळी भावनिक वातावरणात केतनचे आई-वडीलही सहभागी झाले. मुलाच्या आठवणींनी व्याकूळ झालेल्या कुटुंबीयांनी न्यायासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

विशाल अग्रवाल यांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी लोहगड परिसरात उपस्थित असलेल्या अनेक लोकांकडून त्यांना थेट मेसेज येत आहेत. काहींनी त्या दिवशी घडलेल्या घटनांबाबत महत्त्वाची माहिती दिली असून, त्यांनी काही बाबी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याचा दावा केला आहे. मात्र पोलिसांसमोर अधिकृत जबाब देण्यास अनेकजण घाबरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“ज्यांनी काही पाहिले आहे त्यांनी निर्भयपणे पुढे यावे. सत्य बाहेर येणे गरजेचे आहे. कोणालाही त्रास होणार नाही, आम्ही त्यांच्यासोबत आहोत,” असे आवाहन त्यांनी केले. या संदेशांमधून तपासासाठी उपयुक्त ठरणारे धागेदोरे मिळाल्याचेही त्यांनी सूचित केले.

दरम्यान, पोलिस तपासही वेगाने सुरू असून सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याची सुमारे दहा तास चौकशी करण्यात आली. चौकशीत चेतन चौधरी आणि सिया यांची ओळख क्रिकेट स्पर्धेदरम्यान झाल्याची माहिती समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर सिया आणि चेतन एकत्र महाराष्ट्र क्रिकेट लीगचा सामना पाहताना दिसणारा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याबाबत मात्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.

“केतनच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रत्येकाला कठोर शिक्षा झाली पाहिजे. न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही,” अशी भूमिका विशाल अग्रवाल यांनी पुन्हा स्पष्ट केली. प्रत्यक्षदर्शींकडून मिळत असलेल्या माहितीनंतर या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!