जागेची नोंद उताऱ्यावरलावण्यासाठी ५० हजाराच्या लाचेची मागणी! वाघोली तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक
लोणी काळभोर : वाघोली (ता. हवेली) तलाठी कार्यालयातील दोन खाजगी कर्मचाऱ्यांना खरेदी केलेल्या जागेची नोंद ७/१२ उता-यावर लावण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी एका ४६ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, भाऊसाहेब मिकाजी गिरी (वय ५६, रा. साई बालाजी सोसायटी, आव्हाळवाडी, वाघोली, जि. पुणे), संजय मारुती लगड (वय-५३, रा. साईनगर, लोहगाव, ता. हवेली, जि. पुणे) या दोन खाजगी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची नोंद ७/१२ उता-यावर घेण्यासाठी वाघोली (ता. हवेली) तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. ७/१२ उता-यावर नोंद घेण्यासाठीतलाठी कार्यालय वाघोली येथे मदतनीस म्हणून काम करणारे संजय लगड व भाऊसाहेब गिरी यांनी तलाठ्यांकडून काम करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच तक्रारदार यांना मागितली होती. याप्रकरणी एका ४६ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, जागेची नोंद ७/१२ उता-यावर घेण्यासाठी सजा वाघोली तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणारे भाऊसाहेब गिरी यांनी तलाठी पांगे यांच्यासाठी ४५ हजार रुपये व गिरी यांनी स्वतःसाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
तसेच या लाचेसाठी खाजगी इसम संजय लगड यानी सहाय्य केले असल्याचे तपासातून निष्पन झाले. म्हणुन त्या दोघांविरुद्ध लोणी कंद पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.