मोठी बातमी! विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक लवकरच, जिल्हा परिषद अडसर नाही…

नवी दिल्ली : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी लवकरच निवडणुकीचे संकेत मिळत आहेत. २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित असल्या तरी, नियमानुसार या निवडणूक प्रक्रियेला कोणतीही अडचण येणार नाही, असे स्पष्ट चित्र दिसत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारांमध्ये महापालिका व नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समित्यांचे सभापती यांचा समावेश होतो. मात्र, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे या मतदारसंघांतील पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपूनही त्या जागांसाठी निवडणुका घेता आल्या नाहीत. परिणामी, गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या आमदारकीच्या जागा रिक्त आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या कार्यालयाकडून विधान परिषदेच्या १७ मतदारसंघांतील निवडणुकीबाबतचा अहवाल एक-दोन दिवसांत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे.

त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या १७ मतदारसंघांमध्ये महायुतीचे संख्याबळ अधिक असल्याने, महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीला मोठे यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी महापालिका, नगरपालिका तसेच १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. मात्र, राज्यातील २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका अद्याप बाकी आहेत. राज्यात एकूण ३४ जिल्हा परिषदा असून, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेतील लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांची मुदत २०२७ मध्ये संपणार आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येच्या किमान ७५ टक्के मतदार संख्या उपलब्ध असल्यास विधान परिषदेची निवडणूक घेता येते.
या पार्श्वभूमीवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ मतदारसंघांमध्ये मतदारसंख्या ७५ टक्के किंवा त्याहून अधिक असल्याने येथे निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची वाट न पाहता ही निवडणूक नियमानुसार घेतली जाऊ शकते, असे निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार स्पष्ट होते.
विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या नऊ जागांसाठीची निवडणूक येत्या चार–पाच दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार या जागांमध्ये भाजपला ५, शिंदेसेनेला २, राष्ट्रवादी (अजित पवार गट)ला १ आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट)कडे अतिरिक्त १३ मते असल्याने त्यांनी दुसरी जागाही लढवण्याचा निर्णय घेतल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी होऊ शकते.
या १७ मतदारसंघांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या मतदारसंघांमध्ये विधान परिषद निवडणूक घेण्यास आता कोणतीही अडचण नाही, त्यामध्ये सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली–सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा–गोंदिया, रायगड–रत्नागिरी–सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा–चंद्रपूर–गडचिरोली, अमरावती, धाराशिव–लातूर–बीड, परभणी–हिंगोली, छत्रपती संभाजीनगर–जालना आणि नागपूर या मतदारसंघांचा समावेश आहे.