रविवारी मटण आणि दही खाल्ल्यानंतर वृद्ध दाम्पत्याची प्रकृती बिघडली; नाशिकमध्ये महिलेचा मृत्यू, पती ICU मध्ये

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवसभर शेतातील कामे आटोपल्यानंतर रात्री मटण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर वृद्ध दाम्पत्याची अचानक प्रकृती बिघडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर 68 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, त्यांच्या पतीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

ही घटना बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे घडली. मृत महिलेचे नाव द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (वय 68) असे असून, त्यांचे पती शांताराम नानाजी ह्याळीज (वय 78) यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री मटणाचे जेवण केल्यानंतर आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर दोघांचीही प्रकृती अचानक बिघडली. तातडीने त्यांना नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच द्वारकाबाई ह्याळीज यांचा मृत्यू झाला. शांताराम ह्याळीज यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले.

दरम्यान, ही विषबाधा नेमकी मटणामुळे झाली की दहीमुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अन्नाचे तसेच इतर आवश्यक नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या प्रकरणाचा जायखेडा पोलीस तपास करत असून, पोलिसांनी आणि वैद्यकीय प्रशासनाने आवश्यक नमुने जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.