एकनाथ शिंदेंची तातडीची बैठक; विधानपरिषद उमेदवारीबाबत आज मोठा निर्णयाची शक्यता…

पुणे : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित केली आहे.

नंदनवन या शासकीय निवासस्थानी उद्या सायंकाळी ही बैठक होणार असून, यात शिवसेनेच्या उमेदवारांची नावे निश्चित करणे तसेच पक्षांतर्गत मुद्दे आणि नेत्यांच्या वादग्रस्त विधानांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीसाठी पक्षातील प्रमुख नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाचे पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणूकही होणार आहे.

विधानसभेतील सद्यस्थिती आणि पक्षाच्या संख्याबळाचा विचार करता, सत्ताधारी पक्षाला या निवडणुकीत काही जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उमेदवार निवड हा बैठकीतील मुख्य मुद्दा असणार आहे.

दरम्यान, सध्यातरी काही नावांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, उमेदवारीबाबत अंतिम निर्णय बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.
याशिवाय पक्षातील काही नेत्यांच्या अलीकडील वादग्रस्त विधानांमुळे निर्माण झालेली नाराजी आणि संघटनात्मक शिस्त यावरही बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.