Eknath Shinde : भाजपचा विरोध अन् शिंदेंची माघार, ‘हा’ उमेदवार बदलण्याचा निर्णय? घडामोडींना वेग…

Eknath Shinde : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे.
काल भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत देखील याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, हेमंत पाटील यांना उमेदवारी मागे घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला पहिल्यापासूनच भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सतत विरोध पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर भाजपने काल हिंगोलीत आढावा बैठक देखील बोलावली होती. या बैठकीत देखील हेमंत पाटील यांना महायुतीची उमेदवारी नकोच असा सूर उमटला. Eknath Shinde
याचवेळी जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आल्या. तसेच हेमंत पाटील यांना उमेदवारी दिल्यास त्यांचे काम आम्ही करणार नसल्याची थेट भूमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकारी यांनी घेतली आहे.
या सर्व घटनेची गंभीर दखल महायुतीमधील मुख्य नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान, काल रात्री हेमंत पाटील यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आल्याची माहिती असून, त्यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बैठक देखील झाल्याची माहिती मिळत आहे.
हेमंत पाटील यांच्या जागेवर बाबुराव कदम यांना उमेदवारी?
दरम्यान, भाजपकडून होणार विरोध पाहता तात्काळ हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे सूचना सुद्धा दिल्या असल्याची माहिती मिळत आहे. तर, हेमंत पाटील यांच्या जागेवर बाबुराव कदम यांना उमेदवारी देता येऊ शकते का? याची सुद्धा चाचपणी शिवसेनेच्या वतीने केली जात आहे.