महाविद्यालयांच्या परिसरात ई सिगरेट बंद! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय..
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. पारंपरिक सिगारेटबरोबरच अनेक तरुणांकडून ई सिगरेटला पसंती दिली जाते. मात्र महाविद्यालयांच्या परिसरात ई सिगरेटला बंदी घालण्याचे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले आहेत.
सध्या महाविद्यालयीन तरुण व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात तरुणांनी व्यसन करु नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसं पत्र विद्यापीठाकडून काढण्यात आलं आहे. याबाबतची विशेष तपासणी मोहीम राबवण्याची सूचनाही विद्यापीठाने दिल्या आहेत.
अनेक विद्यार्थी ई सिगरेट महाविद्यालयाच्या परिसरात विकली जात असल्याने या व्यसनांच्या जाळ्यात अडकल्याचं मागील काही दिवसांमध्ये समोर आले आहे. त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांवर आळा घालने गरजेचे आहे.
ई सिगरेटचा वापर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालनलयाने विद्यापीठे, महाविद्यालयांना निर्देश दिले होते. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परिपत्रक प्रसिद्ध करून महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांच्या परिसरात ई सिगरेटची विक्री आणि उपयोग होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान इलेक्ट्रॉनिक सिगारेट (उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) प्रतिबंध अधिनियम, २०१९ या अधिनियमाद्वारे इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि उपकरणांच्या पदार्थांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांच्या परिसरांमध्ये विक्री तसेच वापर केला जाणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन महाविद्यालयाला दिले आहेत.