“घरातून उचलून नेलं, खोलीत डांबलं अन् जिवे मारण्याची धमकी”; मुंबईतील माजी नगरसेविकेवर अपहरणाचा आरोप


मुंबई : मुंबईत राजकारणाला हादरवणारे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेला तिच्याच घरातून जबरदस्ती उचलून नेण्यात आलं, बंद खोलीत डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली आणि तोंड उघडल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि त्यांच्या कुटुंबीयांवर करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर भांडुप परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

भांडुपमधील प्रभाग क्रमांक ११० च्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका आशा कोपरकर, त्यांच्या दोन मुली, मुलगा, जावई आणि चालकाविरोधात अपहरण, मारहाण, बेकायदेशीररीत्या डांबून ठेवणे आणि धमकी दिल्याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा कोपरकर या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे सुरेश कोपरकर यांच्याशी कथित अनैतिक संबंध असल्याचा संशय कुटुंबीयांना होता. याच संशयातून संपूर्ण प्रकार घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपींनी तिला तिच्या राहत्या घरातून जबरदस्तीने उचलून नेले. त्यानंतर एका अज्ञात ठिकाणी नेऊन खोलीत बंद करण्यात आले. तिथे तिच्यावर सतत प्रश्नांचा भडीमार करत मारहाण करण्यात आली. एवढंच नाही तर “घडलेला प्रकार कुणाला सांगितलास तर संपवून टाकू,” अशी धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकारात कुटुंबाच्या चालकानेही मदत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पीडित महिलेनं थेट भांडुप पोलीस ठाणे गाठत आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत सर्व आरोपींविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, भांडुप परिसरात कोपरकर कुटुंबाचं मोठं राजकीय वजन मानलं जातं. त्यामुळे एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबावर अपहरण आणि मारहाणीचे गंभीर आरोप झाल्याने मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!