डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग…

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी (१४ एप्रिल) पुणे स्टेशन परिसर, कॅम्प, विश्रांतवाडी आणि इतर भागातील वाहतुकीत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे.
या काळात नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात; तसेच विविध भागात मिरवणुकाही काढल्या जाणार आहेत.
त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी पुणे स्टेशन परिसर, अरोरा टॉवर (कॅम्प), विश्रांतवाडी आणि दांडेकर पूल परिसरातील वाहतुकीत बदल करण्याचा आदेश काढला आहे. यामुळे अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांनी वाहतूक बदलांची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
असा असेल वाहतूक बदल..
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, पुणे स्टेशन
आरटीओ, शाहीर अमर शेख चौक (जुना बाजार) ते मालधक्का चौकादरम्यानची वाहतूक बंद असणार आहे. येथून ‘आरटीओ’ पासून राजा बहादूर मिल रस्त्याने जहांगीर रुग्णालयापासून ‘जीपीओ’ चौकामार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे.
अरोरा टॉवर परिसर, कॅम्प
डॉ. कोयाजी रस्ता, तीन तोफा चौक, इस्कॉन मंदिर चौक, नेहरू चौक व नाझ चौक येथील वाहतूक वळविण्यात येणार आहे.
दरम्यान, डॉ. आंबेडकर पुतळा (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे येणाऱ्या नागरिकांसाठी ‘आरटीओ’शेजारील ‘एसएसपीएमएस’ मैदान, तुकाराम शिंदे वाहनतळ (पुणे स्टेशन) आणि ससून कॉलनी येथे वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल.