बिपरजॉय चक्रीवादळाचे थैमान, विजेचे खांब कोसळले, झाडं पडली, चक्रीवादळ येण्याआधी अंगावर काटा आणणाऱ्या घडामोडी

गुजरात : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीपासून अवघ्या काही किमीवर अंतरावर आहे. हे चक्रीवादळ आज किनाऱ्यावर धडकणार आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले आहे.
किनारपट्टीवर १३० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहत आहेत. वादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी भारत सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गुजरातच्या मांडवी येथे प्रचंड वेगाने वारे वाहू लागले आहेत.
समुद्र प्रचंड खवळला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वाऱ्याचा वेग इतका वाढलाय की किनाऱ्यावरील झाडं अक्षरश: झुकायला लागली आहेत. वारे इतक्या जोरात वाहत आहेत की किनाऱ्यावर उभे राहणे कठीण होऊन बसलं आहे. अजूनही चक्रीवादळ किनाऱ्यापासून ११० किमी अंतरावर आहे. ते गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेला पुढे सरकत आहे.
हे चक्रीवादळ आज संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेच्या सुमारास किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत त्याचा प्रभाव असणार आहे.
भारतीय लष्कर, एनडीआरएफसह सर्व यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारचे मंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी आपला तेलंगणा दौरा रद्द केला आहे. गुजरातच्या सौराष्ट्र, कच्छ, द्वारका येथे बिपरजॉयचा तडाखा बसायला सुरुवात झाला आहे. समुद्र प्रचंड खवळलाय.
समुद्रात उंचच्या उंच लाटा बघायला मिळत आहेत. मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. वाऱ्याचा वेग इतका भयानक आहे की अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे संबंधित परिसरात वीज पुरवठा खंडीत झालाय. हे संकट फार मोठे आहे.
चक्रीवादळाचा प्रभाव जास्त असला तर मोठी हानी होऊ शकते. प्रशासनाने आतापर्यंत हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा गुजरातला जास्त होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चक्रीवादळामुळे मुंबई, कोकणासह, गुजरातच्या नवसारी, द्वारका, सूरत, मांडवी सारख्या भागांमध्ये समुद्र खवळला आहे. समुद्रातील लाटा इतक्या उंच आहेत त्या पाहून मनात धडकी भरतेय.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लष्कर, नौदल, हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दलासह सर्व सशस्त्र दलांनी गुजरातमधील स्थानिक लोकांना मदत देण्यासाठी आवश्यक तयारी केली आहे.