डिलिमिटेशनवरून इंडिया आघाडीत नाराजी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसचा थेट सवाल; म्हणाले, ८५ व्या वर्षी पवारसाहेबांसाठी…

मुंबई : डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना आता महाराष्ट्रातही राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डिलिमिटेशन विधेयकाबाबत समर्थनाची भूमिका घेण्याचे संकेत दिल्याने महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या खासदारांनी विधेयक वाचल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे.
दुसरीकडे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. अशातच महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला थेट सवाल केला आहे. या पोस्टमधून काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीवेळी शरद पवारांना दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली आहे.

काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीची करून दिली आठवण

महाराष्ट्र काँग्रेसने ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, शरद पवार साहेबांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होणार होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती.

काँग्रेसकडे १६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला होता. त्यावेळी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली, असे काँग्रेसने पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘तेव्हा काँग्रेसने साथ दिली, आता भाजपला पाठिंबा देणार?’
काँग्रेसने पुढे डिलिमिटेशन विधेयकाचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसने स्वतःची जागा सोडून शरद पवारांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर हाच पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार असल्याचे संकेत मिळत असल्याचा टोला काँग्रेसने लगावला आहे.
इतकेच नव्हे तर काँग्रेसने एक भावनिक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे. ‘गद्दारांची मांदियाळी असताना राहुल गांधींनी शरद पवार साहेबांना भक्कम आधार दिला होता,’ असे म्हणत काँग्रेसने जुन्या राजकीय पाठिंब्याची आठवण करून दिली आहे.
त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकावरून आता काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येही राजकीय संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस या विधेयकावर नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
