सरकारी जमिनीवरील 2011 पूर्वीची अतिक्रमणे होणार नियमित; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, अंमलबजावणीला वेग


मुंबई : राज्य सरकारने सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 2011 सालापर्यंत झालेली निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

नेमका काय आहे सरकारचा निर्णय?

सरकारच्या निर्णयानुसार, 2011 पूर्वी सरकारी जमिनीवर झालेली निवासी अतिक्रमणे नियमित केली जाणार आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभास्तरीय सहअध्यक्षांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. राज्यभरात एकूण 115 सहअध्यक्ष नियुक्त केले जाणार आहेत.

लाखो कुटुंबांना मिळणार दिलासा

राज्यातील अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे सरकारी जमिनीवरील घरांमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र, ही घरे अतिक्रमित जागेवर असल्याने घरांवर कारवाई होण्याची भीती नागरिकांना सतावत होती. त्यामुळे निवासी अतिक्रमणे नियमित करून घरांना कायदेशीर मान्यता आणि मालकी हक्क मिळावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती.

आता सरकारच्या या निर्णयामुळे अशा कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अतिक्रमणे नियमित झाल्यास नागरिकांना त्यांच्या घरांबाबत कायदेशीर हक्क मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

नियमितीकरणासाठी कोणत्या अटी लागू होणार?

दरम्यान, 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी त्यासाठी नेमक्या कोणत्या अटी लागू असतील, याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रक्रियेत किती कुटुंबांना लाभ मिळणार आणि नियमितीकरणासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील, हेही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे शासनाच्या पुढील मार्गदर्शक सूचनांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!