पतीसोबत रील्स बनवण्यावरून वाद; तरुणी कुटुंबासह विवाहितेच्या घरात घुसली, मारहाण करून सोनंही पळवलं..

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या वादातून एका विवाहितेला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत रील्स बनवणाऱ्या तरुणीला विरोध केल्याने संतापलेल्या तरुणीने आपल्या कुटुंबीयांसह विवाहितेच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याचा आरोप आहे.

एवढेच नव्हे, तर पतीला सोडून दे, अन्यथा जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत विवाहितेच्या अंगावरील १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेही हिसकावून नेल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाणा परिसरातील बजरंगनगर येथे ही घटना घडली.
‘पतीला सोडून दे, नाहीतर जिवंत सोडणार नाही’; घरात घुसून विवाहितेला मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचा पती आणि आरोपी तरुणी एकत्र रील्स बनवत होते. याला विवाहितेचा विरोध होता. याच कारणावरून वाद निर्माण झाल्याचा आरोप आहे. या वादाचा राग मनात धरून संबंधित तरुणीने आपल्या कुटुंबीयांसह बजरंगनगर येथील विवाहितेचे घर गाठले. त्यानंतर घरात घुसून तिला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.


मारहाणीदरम्यान आरोपींनी विवाहितेला ‘पतीला सोडून दे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. यानंतर तिच्या अंगावरील १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून आरोपींनी तेथून पळ काढला.
२२ वर्षीय तरुणीसह कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, म्हाडा कॉलनीतील २२ वर्षीय तरुणीसह तिची आई, वडील, भाऊ आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रील्स बनवण्याच्या वादातून घरात घुसून मारहाण केल्याचा आणि सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
