सिंधूताई सपकाळ यांच्या दत्तकपुत्राकडून अल्पवयीन मुलीचा छळ? वसतिगृहातील प्रकरणी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

अमरावती : जिल्ह्यातील चिखलदरा येथून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे दत्तकपुत्र अरुण सपकाळ यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात चर्चा सुरू झाली असून, पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

चिखलदारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. दिवंगत समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या दत्तक पुत्रावर आरोप आणि गुन्हा दाखल झाल्याने सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पोलिसांकडून पॉक्सो आणि विनयभंगासह विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या जबाबावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनं सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी मात्र पोलिसांकडून अधिक तपशील देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तपासाअंती या प्रकरणातील सत्य कळू शकणार आहे.


