घोडगंगा कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून कारखाना सुरू करा, कारखान्यावर कर्जाचा आकडा ३१५ कोटींवर….

शिरूर : येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. यामुळे हा कारखाना नेमका कधी सुरु होणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारखाना सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार माऊली कटके यांनी साखर संकुल येथे झालेल्या बैठकीत अर्थसंकल्पात 30 कोटीची तरतूद करण्यासाठी संचालक मंडळाचा प्रस्ताव पाठवावा, असे सांगितले.
असे असताना मात्र, कारखान्याने अद्यापपर्यंत प्रस्ताव पाठवला नाही. त्यामुळे कारखाना आम्हाला चालू करायचा आहे. मात्र, प्रस्ताव न आल्याने हा हंगाम देखील वाया जाऊ शकतो. कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळ बरखास्त करावे व कारखाना चालू करावा, अशी मागणी घोडगंगाचे माजी संचालक सुधीर फराटे यांनी केली.
याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर आजपर्यंत 315 कोटी रुपयांची कर्ज आहे. साखर आयुक्त यांनी अनेक वेळा एनसीडीसीसाठीचा कर्ज प्रस्ताव घोडगंगा कारखान्याकडे मागितला असून, जाणीवपूर्वक कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ प्रस्ताव देण्यास टाळाटाळ करत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार माऊली कटके, एमएससी बँकेचे मुख्य प्रशासक अनास्कर, साखर आयुक्त, सहकार आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे, दादापाटील फराटे, घोडगंगाचे अध्यक्ष ऋषिराज पवार, सुधीर फराटे, शशिकांत दसगुडे, राहुल पाचर्णे, राजेंद्र कोरेकर, स्वप्निल ढमढेरे, स्वप्निल गायकवाड, महेश ढमढेरे यांच्या समवेत घोडगंगा चालू कसा करायचा याबाबत बैठक झाली.
ही बैठक 9 जानेवारी 2025 रोजी साखर संकुल येथे झाली होती. या बैठकीत घोडगंगासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 30 कोटी रुपये मदतीची तरतूद करण्याचे ठरले. परंतु संचालक मंडळांनी तसा ठराव दिलेला नाही. त्यामुळे पैसे मिळाले नसल्याचा आरोप फराटे यांनी केला. यामुळे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या पत्रकार परिषदेसाठी घोडगंगा कारखान्याचे संचालक दादापाटील फराटे, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, घोडगंगाचे संचालक सोपान गवारे, विरेंद्र शेलार आदी उपस्थित होते. यामुळे आता कारखान्यावर राजकीय वातावरण तापले आहे.