आजपासून तुमच्या खिशावर थेट परिणाम! LPG, PNG, ATMसह 7 मोठे नियम बदलले; जाणून घ्या सविस्तर..

नवी दिल्ली : जून महिन्याची सुरुवात अनेक महत्त्वाच्या बदलांसह झाली आहे. 1 जून 2026 पासून एलपीजी सिलिंडरचे दर, एटीएम व्यवहार, पॅन कार्ड नियम, सौर पॅनेल धोरण तसेच वाहनांच्या किमतींमध्ये बदल लागू झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर आणि आर्थिक व्यवहारांवर होणार आहे.
व्यावसायिक LPG सिलिंडर महागला

महागाईच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 42 रुपयांची वाढ झाली असून 5 किलोच्या मिनी सिलिंडरची किंमतही 11 रुपयांनी वाढली आहे. मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर आता 3,067.50 रुपयांना मिळणार आहे. मात्र 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
PNG मिळाल्यास LPG कनेक्शन परत करावे लागणार
1 जूनपासून लागू झालेल्या नव्या नियमानुसार ज्या घरांना पाइपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) उपलब्ध होईल, त्यांना 30 दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन परत करावे लागणार आहे. मात्र, ग्राहकांच्या सोयीसाठी कनेक्शन ट्रान्सफर व्हाउचरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मारुती आणि ह्युंदाईच्या गाड्या महागल्या
वाहन खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठीही धक्का आहे. मारुती सुझुकीने आपल्या विविध मॉडेल्सच्या किमती 30 हजार रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. तर ह्युंदाई मोटर इंडियानेही आपल्या वाहनांच्या किमतींमध्ये 12,800 रुपयांपर्यंत वाढ जाहीर केली आहे.

रेल्वे प्रवाशांवर परिणाम
भारतीय रेल्वेने विविध विकासकामांसाठी मोठे ब्लॉक जाहीर केले असून त्याचा परिणाम अनेक राज्यांतील रेल्वे सेवांवर होणार आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
PAN कार्डचे नियम बदलले
पॅन कार्डशी संबंधित काही नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. मालमत्ता व्यवहारांसाठीची मर्यादा वाढविण्यात आली असून काही आर्थिक व्यवहारांसाठी नवीन रिपोर्टिंग नियम लागू करण्यात आले आहेत.
सौर पॅनेलसाठी नवे ALMM नियम
1 जूनपासून सौर ऊर्जा क्षेत्रासाठी नवीन ALMM नियम लागू झाले आहेत. सरकारी अनुदान, नेट-मीटरिंग आणि विविध योजनांसाठी आता केवळ मान्यताप्राप्त यादीतील सौर मॉड्यूल्स आणि सेल्सच वापरता येणार आहेत.
ATM व्यवहार आणि कॅश विड्रॉल नियमांमध्ये बदल
काही बँकांनी एटीएम व्यवहार शुल्क, मोफत व्यवहारांची मर्यादा आणि कॅश विड्रॉलच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. एचडीएफसी बँकेने UPI ATM मधून करण्यात येणाऱ्या रोख रक्कम काढण्याचा समावेश मोफत व्यवहारांच्या मर्यादेत केला आहे. तर पंजाब नॅशनल बँकेने काही डेबिट कार्डधारकांसाठी दैनंदिन कॅश विड्रॉलची मर्यादा कमी केली आहे.
त्यामुळे 1 जूनपासून लागू झालेल्या या बदलांची माहिती असणे प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.