सिया-चेतनचे आधीच गुपचूप लग्न? केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा गौप्यस्फोट; ‘त्या’ व्हॉट्सॲप चॅटमधून धक्कादायक खुलासा

पुणे : केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी सुमारे चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोघांच्या व्हॉट्सॲप चॅटसह इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिस या दिशेने तपास करत आहेत.

केतन अग्रवाल याची १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, सध्या दोघेही १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
तपासादरम्यान पोलिसांनी सिया गोयलच्या घरातून दुसरा मोबाईल जप्त केला. या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीची तपासणी करण्यात आली. या डिजिटल तपासातून पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न केल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी सिया आणि केतन यांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला होता. त्याच कालावधीत हे गुप्त लग्न झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, याबाबत पोलीस अधिक सखोल चौकशी करत आहेत. हे लग्न कुटुंबीयांपासून लपवण्यात आल्याचा दावा केला जात असला, तरी काही घडामोडींवरून कुटुंबातील काही सदस्यांना याची कल्पना असण्याची शक्यताही तपासली जात आहे.

राजस्थानमध्ये स्थायिक होण्याचा होता प्लॅन
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची आधी मैत्री झाली आणि त्यानंतर दोघे प्रेमसंबंधात आले. या काळात त्यांनी राजस्थानमधील उदयपूर आणि जोधपूर येथे एकत्र प्रवास केल्याची माहितीही समोर आली आहे. त्यांच्या काही मित्रांनी दोघांना एकत्र पाहिल्याचे सांगितले असून, लग्नानंतर राजस्थानमध्येच स्थायिक होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याचेही समोर आले आहे.
चेतन चौधरी सियाला राजस्थानी संस्कृती, मारवाडी महिलांचा पेहराव याविषयी माहिती देत असे. तसेच त्यासंदर्भातील व्हिडिओ आणि रील्सही तिला दाखवत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
लग्नानंतर पुणे सोडून उदयपूर किंवा जोधपूर येथे स्थायिक होण्याचा दोघांचा विचार असल्याचा पोलिसांचा दावा आहे. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत असून, फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नोव्हेंबर २०२६ मध्ये सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचा विवाह होणार होता. मात्र, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून केतनला ढकलून त्याची हत्या केल्याचा आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.