सोरतापवाडीत सोरतापेश्वर चरणी भाविक नतमस्तक! प्राचीन शिवकालीन मंदिरात धार्मिक कार्यक्रम…

उरुळीकांचन : प्रतिभिमाशंकर शिवलिंगाचे प्रतिरुप असलेल्या सोरतापवाडी (ता.हवेली) येथील सोरतापेश्वर शिवलिंगाचे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी ‘हरहर महादेव जयघोष’ करीत दर्शन घेतले. रात्री उशिरापर्यंत १० हजाराहून अधिक भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतल्याची माहिती सोरतापेश्वर देवस्थान सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष सुनिल चोरघे व खजिनदार भाऊसाहेब चौधरी यांनी दिली.
प्राचीन शिवकालीन मंदिर असलेल्या सोरतापेश्वर मंदिराला परिसरात धार्मिक स्थान आहे. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी मोठ्या उत्साहात उत्सहाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करुन शिवलिंगाचे दर्शन घेतले.
मंदिरात पहाटे ग्रामोपाध्याय बंडोपंत तिखे यांच्या हस्ते पूजा व अभिषेक घातल्यानंतर मंदिरात काकड आरती, सहस्त्रनाम , ग्रंथ परायण, हरिपाठ पठण आदी कार्यक्रम घेऊन भाविकांनी व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.सर्व धार्मिक कार्यक्रमाला भाविकांनी हजेरी लावत उत्सवाला उधाण आणले होते.
दुपारी ह.भ.प. मसलकर महाराज यांचे कीर्तनात भाविक सहभागी झाले होते. भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात येत होते.उन्हाची तीव्रता अधिक असताना भाविक दर्शनासाठी रांगा लावून दर्शन घेत होते. सायंकाळी ५ वाजेनंतर भाविकांची गर्दी उसळत भाविकांनी रांगेत दर्शन घेतले.
दरम्यान शिवरात्री निमित्त देवस्थान समितीच्या वतीने तीन दिवसीय अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नामांकित किर्तनकार यांचे किर्तन तसेच भरगच्च कार्यक्रम ठेवून भाविकांना या सोहळ्याची पर्वणी उपलब्ध करुन दिली आहे. या सोहळ्याचे आयोजनात पांडुरंग म्हस्के, सहदेव सावंत, रवी चौधरी, अशोक चौधरी, विठ्ठल कोळेकर यांनी परिश्रम घेतले.