देवेंद्रजी जनसेवेच्या मंदिरात सामान्य जनतेची एवढी धास्ती का घेत आहात? सामान्य माणूस न्याय मागण्यासाठी मंदिरात येवू नये यासाठी षडयंत्र?

मुंबई : मुंबईत मंत्रालयात जाण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याने माजी खासदार शेतकरी नेते राजू शेट्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संतापले आहेत. ते म्हणाले, गेली दोन दिवस कामानिम्मीत्त मंत्रालयात जाण्याचा योग आला. मंत्रालय म्हणजे राज्यातील सर्वसामान्य जनता, गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या सेवेसाठी उभारलेले जनसेवेचे मंदिर आहे. मंत्रालयाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलू लागले आहे.सामान्य माणूस आपल्या अडचणी सोडविण्यासाठी कामांचा पाठपुरावा करण्यासाठी शेकडो किलोमीटर वरून मिळेल त्या वाहनाने रात्रभर जागरण करत मुंबईतील मंत्रालय गाठतो.
सकाळी कुठेतरी स्टॅण्डवर, रेल्वे स्टेशनवर अथवा थोडा वजनदार असला कि आमदार निवासात आंघोळ पाणी करून हातात कागदपत्रांची पिशवी जनसेवेच्या मंदिरात म्हणजेच मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी रांगेत उभा राहतो.जवळपास तास दिड तासाच्या प्रतिक्षेनंतर आपल्याजवळील आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र दाखवून करपलेला चेहरा कॅमे-यासमोर दाखवित त्याला २ नंतर मंत्रालयात प्रवेश करण्याचा पास मिळतो. यानंतर तो लांबलचक रांगेत उभा राहून मंत्रालयातील गेटवर आपली कागदपत्रांची पिशवी सांभाळत मंत्रालयाच्या गेटवर आपले ओळखपत्र दाखवित प्रवेश करताना तीन पोलिसांची तपासणी, स्कॅनर मशिनची तपासणी केल्यानंतर तो मंत्रालयाच्या आवारात पाय ठेवतो.
या सगळ्या गोष्टीत त्याचा अर्धा तास तरी जातो.सकाळी तास अन् तास रांगेत उभे राहून पुन्हा ज्या विभागात काम आहे त्याठिकाणी जाण्यासाठी त्याला पुन्हा एकदा डिजी प्रवेशाच्या रांगेत उभे रहावे लागते मग त्याठिकाणी त्याचा करपलेला चेहरा स्कॅन झालेनंतर तो संबधित विभागाच्या पाय-या झिजवित झिजवित मंत्रालयातील मारलेल्या जाळ्याकडे बघत कामास सुरवात करतो पुढील त्याच्या कामाचा सारीपाट याठिकाणी न मांडलेले बरे.मुळात तालुका व जिल्हा पातळींवर होणारी पिळवणूक, अडवणूक याला कंटाळून मंत्रालयात तरी न्याय मिळेल ही भाबडी आशा मनात घेऊन मायावी नगरीत पाय ठेवलेला या अभ्यागतांना शासन व प्रशासन म्हणजे काय याची चांगलीच प्रचिती येते.
मुख्यमंत्री महोदय जनतेच्या जनसेवेच्या मंदिरात येण्यासाठी सामान्यांना एवढा आटापिटा करावा लागत असेल तर हे या जनसेवेच्या मंदिरातील देव- देवतांचे पुजा-यांचे अपयश आहे कि सामान्य माणूस न्याय मागण्यासाठी या मंदिरात येवू नये याकरिता रचलेले षडयंत्र आहे हे कळेना. या मंदिरात अनेक बडवे , दलाल , बडे उद्योगपती राजरोसपणे दररोज फे-या मारतात त्यांना मात्र याठिकाणी रेड कार्पेट टाकलेले आहे त्यांना इतक्या सहजगत्या प्रवेश कसा मिळतो हे अनाकलनीय आहे. हे लोक मात्र सकाळी मंत्रालयाचा दरवाजा उघडण्या आधीच दारात उभे असतात. मुळात सामान्य माणसाला याठिकाणी आपले प्रश्न मांडण्यासाठी एवढ्या खस्ता खाव्या लागत असतील तर मंत्रालयातील कामकाज नेमके कुणासाठी चालले आहे हा संशोधनाचा विषय होवू लागला आहे.
देवेंद्रजी अनेक लोक आपल्याला न्याय मिळत नाही म्हणून मंत्रालयात येवून आत्महत्या करत आहेत म्हणून तुम्ही मंत्रालयालाच जाळी मारून टाकलात.मंत्रालयातील सातही मजल्यावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. एखादी व्यक्ती पाच मिनीटांपेक्षा जास्त लॅाबीत उभारली किंवा बसली तर पोलिस त्यांना थांबू व बसू देत नाहीत. अधिकारी व मंत्र्यांना जागा कमी पडू लागल्याने तुम्ही राजरोसपणे नियम धाब्यावर बसवून मंत्रालयातील मंत्र्याच्या व सचिवांच्या दालनाबाहेर असलेल्या प्रतिक्षालयात अलिशान कार्यालये ऊभारलेला आहात हे दररोज तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत असता.एकीकडे मंत्र्याचा जनता दरबार भरवायचा आणि दुसरीकडे याच मंत्र्यांना व सचिवांना भेटण्यासाठी जनतेला मेटाकुटीस आणायचे.
सर्व विभागातील आवक जावक मंत्रालयाच्या मुख्य गेटवर करण्यात आलेले आहे.याठिकाणी सर्वजण पत्रव्यवहार केल्यास तो संबधित विभागाकडे जातो मात्र त्याच्यावर कारवाई काय झाली हा संशोधनाचा विषय असतो. यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने तुम्हाला विनंती कि , सामान्य माणसाच्या कामाचा सहजगत्या निपटारा होण्यासाठी मंत्रालयातील दांडके काढून गुड गव्हर्नन्स चा कारभार जनतेला दाखवावा लागेल अन्यथा १०० दिवसाचा कृती कार्यक्रम म्हणजे स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी व माध्यमांमध्ये प्रसिध्दीसाठी सुरू असलेला प्रयास असून मंत्रालयातील कारभार मात्र वरातीमागून घोडे अशाच पध्दतीने आजही सुरू आहे. अशी पोस्ट राजू शेट्टी यांनी केली आहे.