SIR प्रक्रियेबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; मतदारांना केले महत्त्वाचे आवाहन, काय म्हणाले मुख्यमंत्री?


मुंबई : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. इंडिया आघाडी आणि काँग्रेससह विरोधकांकडून या प्रक्रियेवर आक्षेप घेतले जात आहेत. ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणीही विरोधकांनी लावून धरली आहे.

या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयातही प्रकरण पोहोचले आहे. अशातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयआर प्रक्रियेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, यामुळे संबंधित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याबाबत माहिती दिली. प्रारूप मतदार यादीतून नाव वगळले गेले असेल, नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक असेल किंवा वैयक्तिक तपशीलांमध्ये दुरुस्ती करायची असेल, तर नागरिकांना आता अतिरिक्त वेळ मिळणार आहे. मतदारांना २६ ऑक्टोबरपर्यंत आपले दावे आणि हरकती नोंदवता येणार आहेत.

मतदारांसाठी महत्त्वाच्या तारखा कोणत्या?

एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

२६ ऑक्टोबर: दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत.

१० नोव्हेंबर: प्राप्त दावे आणि हरकती निकाली काढण्याची अंतिम तारीख.

१६ नोव्हेंबर: अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार.

नाव वगळले असेल तर काय करायचे?

प्रारूप मतदार यादीतून नाव वगळले गेले असल्यास किंवा नावातील स्पेलिंग, इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास नागरिकांना संबंधित निवडणूक अधिकारी कार्यालयात किंवा उपलब्ध ऑनलाइन सुविधेद्वारे दावे आणि हरकती दाखल करता येतील.

२६ ऑक्टोबरपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची प्रशासनाकडून छाननी करण्यात येईल. त्यानंतर १० नोव्हेंबरपर्यंत दावे आणि हरकतींवर निर्णय घेतला जाईल. आवश्यक दुरुस्त्या पूर्ण झाल्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

त्यामुळे पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची तपासणी करून घ्यावी आणि नाव वगळले गेले असल्यास किंवा तपशिलांत चुका असल्यास मुदतीत अर्ज करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!