उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणे दौरा; ‘या ‘ कारणावरून पोलीस आयुक्तांवर संतापले…

पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी हिंजवडी येथील वाहतूक कोंडीची पाहणी करत अन्य ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येची माहिती घेतली. यावर लवकरच तोडगा काढण्यासाठी अधिकारी व स्थानिक नेत्यांसोबत ही पाहणी केली. या पाहणी वेळी अजित पवारांनी पोलीस आयुक्तांवर आपली नाराजी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागत आहेत. मग पिक टाईममध्ये काय अवस्था होत असेल, असा सवाल केला. अजित पवारांचा पाहणी दौरा सुरू होता. त्यावेळी वाहतूक रहदारी थांबवण्यात आली होती. यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यावेळी अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यावर संताप व्यक्त केला. ‘ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केलीय?, सगळी वाहतूक सुरु करा’, अशा शब्दात अजित पवारांनी त्यांना सुनावले.
दरम्यान अजित पवार यांनी आज पहाटेच चाकण एमआयडीसी जवळी भागाला भेट दिली. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी होत असते. या भाागाते अनेक लहान मोठे उद्योगधंदे आहेत. त्यामुळे वाहतुकीचा समस्येवर तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या.
