उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली अनिल कस्पटे कुटूंबियांची भेट, मोठं वक्तव्य करत म्हणाले, वैष्णवीला परत आणणे शक्य नाही, पण…

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीनं जीवन संपवले. हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिच्या कुटूंबाची भेट घेतली.

यावेळी अजित पवार म्हणाले, पुण्यातील वाकड येथे अनिल कस्पटे आणि कुटुंबीयांची आज त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. या दुःखद प्रसंगी त्यांच्याशी सहवेदना व्यक्त केल्या आणि त्यांचं सांत्वन केलं. कस्पटे कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या भावना मन हेलावून टाकणाऱ्या होत्या. आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांना मी यावेळी दिली.
वैष्णवीला परत आणणे शक्य नाही, मात्र तिला, मानसिक वा शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कार्यवाही करणे निश्चितच शक्य आहे, याची ग्वाही दिली. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कुणाचीही गय करू नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला आधीच दिल्या आहेत.

तसेच या प्रकरणाची जलद सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत घेण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून तातडीनं आदेश देण्यात येतील, हेही स्पष्ट केले. या कठीण काळात आम्ही सर्व खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत, कुठलीही चिंता करू नका. न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा, आपल्याला नक्की न्याय मिळेल, असे आश्वासित केले.
तसंच वैष्णवीच्या लहान बाळाच्या उज्वल भविष्यासाठी तुमच्यासह आमचीदेखील तितकीच जबाबदारी राहील, याचा विश्वास दिला. असेही अजित पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, हे प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. यामुळे न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलिसांनी सर्वांना अटक केली आहे.