शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीची तारीख जाहीर; पुढील 10 दिवसांत निर्णयाची अंमलबजावणी?

अहिल्यानगर : पेरणीच्या तोंडावर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या कर्जमाफीबाबत राज्य सरकारकडून महत्त्वाचे संकेत देण्यात आले असून, येत्या दहा दिवसांत कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती मिळणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गात आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात बोलताना कृषीमंत्र्यांनी ही माहिती दिली. त्यांच्या वक्तव्यानंतर कर्जमाफीचा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अधिवेशनात राज्य सरकारने 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पातही यासाठी तरतूद करण्यात आली होती.
राज्यातील शेतकरी संघटना आणि विविध नेत्यांकडून सातत्याने कर्जमाफीची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभाचीही तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे, ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करणे आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. पात्रता तपासणी आणि लाभ वितरणासाठी या प्रक्रिया महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

कर्जमाफीचा फायदा केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर बँकिंग क्षेत्रालाही होणार आहे. राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच पीक कर्ज देणाऱ्या पतसंस्था आणि राष्ट्रीयकृत बँकांकडे मोठ्या प्रमाणात थकीत कर्जे आहेत. सरकारकडून ही रक्कम भरली गेल्यास बँकांची वसुली होईल आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळेल. थकीत कर्जखाती कमी झाल्याने बँकांची पत आणि कर्जवाटप क्षमता वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अधिकृत शासन निर्णय आणि अंमलबजावणीची प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मृग नक्षत्राच्या आगमनापूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळाल्यास नव्या हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.