लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता रखडला, नेमकं घडलं काय? पैसे कधी मिळणार? जाणून घ्या…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या योजनेने महिलांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला होता. डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नुकताच ट्रान्सफर करण्यात आला. मात्र, योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील हजारो महिलांना गेल्या दोन महिन्यांपासून हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे.

आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे येणार नाहीत असे वाटत होते. मात्र, डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला. त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर जमा करण्यात येईल असा दावा करण्यात येत होता.
सरकारमधील नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या या दाव्याचा महानगरपालिका निवडणुकीवर परिणाम होईल असे सांगत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर निवडणूक आयोगाने डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यास मंजुरी दिली पण जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यास मज्जाव केला. अखेर सरकारकडून डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला. पण अद्यापही अनेक लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता रखडला आहे.
मुंबई, ठाणे, कोकणासह पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि विदर्भातील अनेक भागांतील महिलांना नोव्हेंबर महिन्यापासूनचा हप्ताच मिळाला नाहीये. आम्हाला ऑक्टोबरपर्यंतचे पैसे मिळाले, पण त्यानंतरच्या हप्त्यांचे काय? असा प्रश्न या महिला विचारत आहेत. ग्रामीण भागातील महिला या मदतीवर अवलंबून असल्याने त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा न झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक महिलांच्या आधार लिंकिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. तसेच, काही लाभार्थ्यांच्या अर्जांची फेरपडताळणी सुरू असल्यामुळे ही प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे.
दरम्यान, सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. अद्यापही काही महिलांनी आपले ई-केवायसी केले नाहीये. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींचा हप्ता थांबवला का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
येत्या काळात जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच नोव्हेंबर आणि डिसेंबरची थकीत रक्कम (एकूण 4500 रुपये) जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता कायम आहे.