Daund News : दौंडमधील मलठणमध्ये बेकायदेशीर असलेल्या कोळसा खाणीवर वनविभागाची कारवाई, एका मालकावर गुन्हा दाखल..

Daund News दौंड तालुक्यातील मलठण येथील बेकायदा कोळसा खाणीवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी एका कोळसा खाण मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती दौंड चे वनपाल नानासाहेब चव्हाण यांनी दिली.

दिलीप संभाजी सांगळे ( रा. शिरापूर ,ता.दौंड, जि.पुणे) असे या खाणमालकाचे नाव आहे.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील आणि भीमा नदीच्या पट्ट्यातील मलठण, वाटलूज, नायगाव, राजेगाव या गावांमधील वन विभागाच्या हद्दीतील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदा ऊसतोड करून त्या ठिकाणी कोळसा खाणी सुरू होत्या.

मागील कित्येक दिवसांपासून वन शेतात हा प्रकार खुलेआम सुरू होता. महान्यूज ने हे प्रकरण बेधडकपणे उचलून धरत सविस्तर वृत्तमालिका प्रसिद्ध करून या प्रकरणाला वाचा फोडली.
परिणामी वन विभागाचे दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि वनरक्षक यांच्यावर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. मात्र या प्रकरणातील मुख्य वृक्षतोड व कोळसा खाणी मालक व सूत्रधार यांच्यावर अद्याप कारवाई केली गेली नसल्याने ते मोकाट फिरत आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच आता या कोळसा खाण मालकांनी आपला मोर्चा खाजगी शेत जमिनीतील वृक्षतोडीकडे वळवला आहे.
बोरीबेल – मलठण रस्तलगत मलठण हद्दीत एका शेतकऱ्याच्या शेत जमिनीतील काटेरी वृक्ष तोडून त्या ठिकाणी कोळसा भट्टी सुरू होती. ह्या प्रकरणी दौंड वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.१३) छापा टाकून कारवाई केली. Daund News
मलठण हद्दीतील खाजगी शेत जमिनीत दोन मजुरांच्या साह्याने वृक्षतोड करून त्या ठिकाणी कोळसा भट्टी सुरू केली असल्याचे यावेळी वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. तसेच या ठिकाणी कोळसा खाणीसाठी लाकडांचे ढिग साठवून ठेवणल्याचेही दिसून आले. या प्रकरणी पंचनामा करीत वृक्षतोड केलेली लाकडे जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणी खाण मालक दिलीप सांगळे याच्यावर महाराष्ट्र वन नियमावली २०१४ नियम ५३(१) अनुयायी वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे वन विभागाचे सहाय्यक उपवन संरक्षक दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड वनपरक्षेत्र प्रभारी तालुका अधिकारी शुभांगी लोणकर, दौंड वनपाल नानासाहेब चव्हाण, वनरक्षक निखिल इंगळे, गोकुळ गवळी, निखिल गुंड आदींनी ही कारवाई केली.
दरम्यान, दिलीप सांगळे हा मुख्य कोळसा खाणी मालक असून त्याने मलठण, राजेगाव, वाटलुज, नायगाव येथील वनविभागाच्या हद्दीत बेकायदा वृक्षतोड आणि कोळसा खाणी सुरू केल्या होत्या. याप्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे.