Daund : पाण्यासाठी संघर्ष पेटला! पाटस परिसरात शेतकऱ्यांचा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव..


Daund : खडकवासला कालव्याचे पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी सोडावे या मागणीसाठी पाटस परिसरातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.१९) आक्रमक पवित्र घेतला. पाटस पाटबंधारे विभागीय कार्यालयाचे शाखा अभियंता यांना कार्यालयात घेराव घालून यासंदर्भात जाब विचारला.

दौंड तालुक्यात अनेक गावांत सध्या पिण्यासाठी आणि शेतीसाठी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गाव बंधारे, तलाव, विहिरी बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध नसल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठीही पाणी उपलब्ध नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत‌.

एकीकडे खडकवासला कालवा पाण्याने तुडुंब भरून इंदापूरच्या दिशेने वाहत आहे. मात्र दौंड तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले जात नाही. अनेक वेळा लेखी व तोंडी मागणी करूनही पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी शेतकऱ्यांना उलटसुलट उत्तरे देत आहेत.

त्यामुळे अखेर शुक्रवारी (दि १९) पाटस परिसरातील शेतकऱ्यांनी थेट पाटस येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले आणि शाखा अभियंता उत्कर्ष पाटील यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. धरणग्रस्तांचे सर्वात जास्त पुनर्वसन हे दौंड तालुक्यात झाले आहे.

पाटस परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी पुनर्वसनग्रस्तांना दिल्या आहेत. असे असताना दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना नेहमी पाण्यापासून वंचित ठेवले जाते. पाण्याचे आवर्तन वेळेवर सोडले जात नाही. सध्या कुठेही पाणी उपलब्ध नसल्याने आम्ही पाणीपट्टी भरूनही आम्हाला वेळेवर पाणी सोडले जात नाही.

दुसरीकडे इंदापूरला मागील महिन्यापासून पाणी सोडले गेले आहे. पाण्याची आवश्यकता सर्वांना आहे, इंदापूरला पाणी सोडण्याला आमचा विरोध नाही, पण आम्हाला पण आमच्या हक्काचे पाणी वेळेवर दिले पाहिजे. अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाटील यांच्याकडे केली. Daund

पाण्याअभावी शेतपिके जळून चालली आहेत. पिण्यापुरतही पाणी उपलब्ध नाही अशी भयानक परिस्थिती असताना पाटस बंधाऱ्याचे विभागाचे अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश नाही पाणी सोडणार नाही अशी उडवा उडवीचे उत्तर देतात.

दरम्यान पाटसमधील वितरिका क्रमांक २७ ला तसेच इतर वितरिकांमध्ये त्वरित पाणी सोडले गेले नाही, तर शेतकरी ते फोडून पाणी नेतील असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी शाखा अभियंता पाटील यांना दिला.

दरम्यान यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा करताना पाटबंधारे विभागाचे पाटस कार्यालयाचे शाखा अभियंता उत्कर्ष पाटील म्हणाले की, दौंड तालुक्यातील पूर्व भागात पाण्याचा आवर्तन सोडले गेले आहे. त्यामुळे जसं जसं खालच्या भागातील पाण्याचा आवर्तन पूर्ण होईल तसे आपल्याकडेही पाण्याचा आवर्तन सोडले जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून त्वरित पाणी सोडू असे आश्वासन यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!