हुंड्यासाठी सुनेला मारहाण! मध्यरात्री सुनेच्या खोलीत सोडला साप अन्… सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हुंड्यासाठी सासरच्या लोकांचं एक धक्कादायक कृत्य उघडकीस आलं आहे. हुंडा न दिल्यामुळे सासरच्यांनी नवविवाहित महिलेला एका खोलीत बंद केलं आणि तिच्यावर साप सोडल्याचा आरोप आहे.

साप चावल्यानंतर महिलेची प्रकृती बिघडली. परंतु तिला वाचवण्याऐवजी कुटुंबातील सदस्य फक्त पाहत राहिले. सुदैवाने तिची बहीण तेवढ्यात घटनास्थळी आली आणि तिने महिलेला रुग्णालयात नेले.
पीडित महिलेची बहीण रिझवानाने सांगितलं की, रेश्माचा विवाह 19 मार्च 2021 रोजी कर्नलगंज येथील रहिवासी शाहनवाजशी झाला होता. लग्न झाल्यापासून तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिला टोमणे मारणे आणि छळ करण्यास सुरुवात केली होती.

काही काळापूर्वी तिच्या पालकांनी सासरच्यांना तब्बल दीड लाख रुपये दिले, परंतु ते अतिरिक्त 5 लाख रुपयांची मागणी पूर्ण न झाल्याने सतत वाद घालत होते. 18 सप्टेंबर रोजी सासरच्यांनी रेश्माला जुन्या खोलीत बंद केलं आणि नाल्यातून तिच्यावर साप सोडण्यात आला.

रात्री उशिरा सापाने रेश्माच्या पायाला चावा घेतला. ती वेदनेने ओरडली, पण कुटुंबातील सदस्यांनी दार उघडले नाही, ते बाहेर हसत उभे होते. तेव्हा रेश्माने कसाबसा आपल्या बहिणीला फोन केला. हे ऐकताच बहीण तात्काळ घरी पोहोचली. तिने दार उघडलं आणि रेश्माला गंभीर अवस्थेत हॅलेट रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती रिझवानाने दिली आहे.
त्यानंतर रिझवानानो पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून, पोलिसांनी रेश्माचा पती शाहनवाज, त्याचे आई-वडील, मोठा दीर, नंदेसह सात जणांविरुद्ध गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. ज्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न समाविष्ट आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.